सातारा प्रतिनिधी | स्वच्छता अभियानात झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी सातारा जिल्ह्यातील मेढा नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी महेश गायकवाड यांच्या चौकशीचा आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी दिला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाधिकार्यांना सात दिवसांत अहवाल पाठवावा, असे या आदेशात म्हटले आहे. याबाबत गायकवाड यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.
स्वच्छता अभियानात मेढा नगरपंचायतीने तीन महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर बलून घेतला होता. हा बलून हवेत तरगंत ठेवण्यात आला होता. या बलूनद्वारे स्वच्छतेच्या जाहिरातीसाठी लाखो रुपयांची उधळण करण्यात आली. ‘स्वच्छता अभियान 2019’ मध्ये जनजागृतीचा ठेका जिओलॉन कंपनीला देण्यात आला होता.
नगरपंचायतीने या कंपनीशी 31 ऑक्टोबर रोजी करार केला होता. या करारात तीन महिन्यांसाठी बलून पुरवण्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. या तीन महिन्यांत बलून योग्य उंचीवर तरंगत ठेवण्याच्या नावाखाली एक लाख 13 हजार 280 रुपये एवढी मोठी रक्कम संबंधित कंपनीला अदा करण्यात आली.
यातून नगरपंचायतीच्या पैशांचा अपव्यय झाला. आरोग्य, वीज अशी कामे करणे आवश्यक असताना, मेढ्यातील जनतेने कररुपाने दिलेल्या पैशांचा दुरुपयोग करण्यात आला. या भ्रष्टाचाराची योग्य चौकशी करावी. तत्कालीन मुख्याधिकार्यांना निलंबित करावे. या भ्रष्टाचारात सामील असलेल्या अधिकार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे यासंबंधीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.