सातारा प्रतिनिधी | आतापर्यंत आपण कुत्रा किंव्हा साप चावल्याच्या घटना एकल्या असतील. मात्र, आता चक्क एका पाळीव गाढवाने चावा घेतल्याने एक अडीच वर्षाच्या चिमुकली जखमी झाल्याची घटना खटाव तालुक्यातील मायणी येथे घडली आहे. या घटनेप्रकरणी गाढवाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिरा मोहसीन मुजावर (वय 2.5 रा. मायणी, ता. खटाव) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव असून ती गंभीररीत्या जखमी झाली आहे. गाढवाचे मालक राजेंद्र मारुती धोत्रे (रा. इंदिरानगर, मायणी) यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मायणी येथील एसटी बस स्थानक परिसरात मोहसीन रसूल मुजावर हे चुरमुरे व्यापारी परिवारासह रहात आहेत. बस स्थानकास लागूनच असलेल्या बाजार पटांगणावरील तांबोळी हॉटेलच्या पाठीमागील रोडवर मुजावर यांची अडीच वर्षांची मुलगी माहिरा खेळत होती. त्यावेळी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास तेथे राजेंद्र धोत्रे यांच्या मालकीचे गाढव फिरत आले.
रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुरडीला काही कळण्याआधीच गाढवाने अचानक तिचा चावा घेतला. डोक्याच्या डाव्या बाजूस चावा घेतल्याने मुलगी गंभीररीत्या जखमी झाली. काही अंतर गाढवाने तिला फरफटही नेले. त्यावेळी तेथील काही रहिवाशांनी मुलीची गाढवापासून सुटका केली. जखमी झालेल्या मुलीस विटा, मिरज व त्यानंतर कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गाढवास मुसके न घालता व सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना न करता मालक धोत्रे यांनी हलगर्जीपणा करून गाढवास मोकाट सोडल्यामुळेच मुलगी गंभीररीत्या जखमी झाल्याची फिर्याद मुलीचे वडील मोहसीन मुजावर यांनी पोलिसात दिली आहे. पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गंबरे पुढील तपास करीत आहेत.