“आजच लग्न कर,”असं म्हणत ‘त्यानं’ युवतीला जबरदस्तीनं गाडीत बसवलं; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । भर दुपारी ती आपल्या घरामध्ये झोपली होती. इतक्यात कुणीतरी दरवाजात आल्याचं तिनं पाहिलं. दरवाजापुढं जाताच तो सात ते आठ जणांसह उभा असलेला तिनं पाहिला. मग क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, हे बघ मी तयार होऊन आलोय, आपण दोघं आजच लग्न करू, असं त्यानं बोलताच तिला धक्का बसला. काही करणार इतक्यात त्यानं इतरांसह युवतीला घराबाहेर ओढून काढलं. तिला गाडीत घालून नेवून जबरदस्तीने कारमध्ये बसवले. मात्र, तिने आरडाओरडा केल्यामुळे ग्रामस्थांनी अपहरण करणाऱ्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले तर काहीजण पळून गेले आणि अपहरणाचा त्यांचा डाव फसला. कराड तालुक्यात या धक्कादायक घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड दक्षिण विभागातील एका गावात ही घटना घडली. युवतीच्या अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नऊ जणांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील नारायण पवार (ता. वाळवा, जि. सांगली), माणिक निवृत्ती लाड (रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्यासह अन्य सात जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड दक्षिण विभागातील एका गावातील युवती २०१६ मध्ये नातेवाइकांकडे शिक्षणासाठी राहत होती. त्यावेळी सुनील पवार याचे तिच्या घरी येणे- जाणे होते. त्यातूनच सुनील पवार याने त्या युवतीला लग्नाची मागणी घालून “मला तू आवडतेस,” असे सांगितले होते. मात्र, ही बाब समजल्यानंतर युवतीच्या पालकांनी तिला गावी आणले. त्यानंतर सुनील पवार याने वारंवार युवतीशी संपर्क साधला. मात्र, “लग्नाला माझा व माझ्या आई- वडिलांचा विरोध असून, हे लग्न होऊ शकत नाही,” असे युवतीने त्याला सांगितले. एप्रिल २०२३ नंतर युवतीने सुनीलशी असलेला संपर्क तोडला.

दरम्यान, शनिवारी दुपारी जेवण केल्यानंतर पीडित युवती त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या आजीच्या घरी झोपण्यासाठी गेली होती. त्यावेळी अचानक सात ते आठ जण घरात घुसले. त्यांनी त्या युवतीला जबरदस्तीने ओढत घराबाहेर आणले. कारमध्ये घालून त्यांनी तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुनील पवार याला युवतीने ओळखले. तिने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ त्याठिकाणी जमले. त्यांनी पाठलाग करून युवतीची सुटका केली, तसेच माणिक लाड या संशयिताला जागीच पकडले. मात्र, इतर सात ते आठ जण कारमधून, तसेच दुचाकीवरून पळून गेले. याबाबत पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अर्चना शिंदे तपास करीत आहेत.