सातारा प्रतिनिधी। मित्रासोबत अनेकदा किरकोळ कारणांवरून भांडण झालं कि ते फारसं कुणी मनावर घेत नाही. मात्र, चक्क रिक्षाचे भाडे भरण्यासाठी पैसे मागितल्याचा कारणावरून चिडून जाऊन एका मित्राने आपल्या मित्राला मारहाण केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात घडली आहे. याप्रकरणी एक जणावर फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण येथील आंबेडकर चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये अमित दोरगे ( रा. लक्ष्मीनगर, फलटण) आणि त्यांचा मित्र प्रसाद शिंदे (रा. डीएड चौक फलटण) हे दोघे बसले होते. यावेळी अमित दोरगे याने प्रसाद शिंदे याला ‘रिक्षाचे भाडे भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे तू भाडे भर, असे म्हंटले. यावरून चिडून जाऊन प्रसाद शिंदे याने आपला मित्र अमित दोरगे याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडून गेला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी मारहाण करणाऱ्या प्रसाद याच्या तावडीतून अमित याला सोडवले. त्यानंतर मारहाण झालेल्या अमितने मारहाण करणाऱ्या प्रसादच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फलटण शहर पोलिसांकडून केला जात आहे.