कराड प्रतिनिधी | मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी गुऱ्हाळ घरावरील गंजीला आग लावल्याची घटना सुपने, ता. कराड येथे घडली. यामध्ये गंज पूर्णपणे जळून खाक झाली. कराड पालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आग विजवली. या आगीमध्ये गुऱ्हाळ मालकाचे ५ ते ६ लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की. कराड तालुक्यातील सुपने- किरपे या गावांच्या मार्गावर पाळक नावाच्या शिवारात सुपणे येथील लालासो पाटील यांचे गुऱ्हाळ आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास येथील गंजीला आग लागली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आणे येथील ट्रक्टर चालकाने गुऱ्हाळ मालक लालासो पाटील यांच्या कुटुंबियांना आगीबाबत माहिती दिली. त्यानंतर पाटील कुटुंबियांनी गुऱ्हाळाकडे धाव घेत आग विजवण्याचा प्रयत्न केला.
तसेच घडलेल्या घटनेबाबत कराड पोलिस ठाणे व अग्निशामक दलास कल्पना दिली असता. अग्निशामक दलाचे कर्मचारी काही वेळानंतर घटनास्थळी दाखल झाले.
तसेच अग्निशामक दलाच्या वतीने पाण्याची फवारणी करून आग विझवण्यात आली. तत्पूर्वी गावातील एका जेसीबीने गुऱ्हाळ घर परिसरातील सरपण दुसरी गंज आग लागलेल्या गंजीपासून दुसरीकडे हलविण्यात आली. पहाटे गंजिला लागलेली आग विझवण्यात अग्निशामक दलास यश आले.
तिसऱ्यांदा घडला प्रकार…
सूपणे येथील गुऱ्हाळमालक लालासो पाटील यांच्या गंजीला आग लागल्याचा तिसऱ्यांदा प्रकार घडला आहे. या आगीच्या घटनेमागे अज्ञाताचा हात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.