आरडा ओरडा करु नको म्हटल्यावर ‘त्याचा’ चढला डोक्याचा पारा; थेट चाकूने केले सपासप वार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. कारण मोठ्या प्रमाणात दरोडे, प्राणघातक हल्ला आदी घटना घडू लागल्या आहेत. अशीच जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना सातारा तालुक्यातील वडूथ येथे रविवारी रात्री घडली. वडूथ येथे आरडाओरडा करु नको, असे म्हटल्याच्या कारणातून चिडून जाऊन चाकूने एकाने थेट खिशातून चाकू बाहेर काढत वृद्धावर हल्ला करत त्यांचा खून केला आहे. पोपट गुलाब मदने (वय 65, रा. वडूथ) असे मृत व्यक्तीचे नाव असून उमेश गुलाब राठोड (वय 36 ) असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी उमेशला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वडूथ येथे पोपट मदने हे कुटुंबियांसोबत एकत्र राहत आहेत. मदने व राठोड एकाच परिसरात जवळजवळ राहत असल्यामुळे रविवारी रात्री उमेश राठोड हा आरडाओरडा करू लागला. घरामध्ये वृध्द माणसे व लहान बाळ असल्याने मदने कुटुंबियांनी उमेश याला आरडाओरडा करु नको, असे म्हटले. यातून वादावादीला सुरुवात झाली. पाहता पाहता वाद विकोपाला गेला व चिडलेल्या उमेश याने धारदार चाकू काढून पोपट मदने यांच्या छातीवर सपासप वार केले. यात पोपट मदने गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी उमेशने आणखी एकावर हल्ला करत त्याला जखमी केले. अचानक घडलेल्या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. यावेळी काही नागरिकांनी या घडलेल्या घटनेची तालुका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिसांनी रात्री उशिरा संशयिताला ताब्यात घेतले. सागर पोपट मदने (रा. वडूथ) यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके करत आहेत.