सातारा प्रतिनिधी | मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या एका फोनमुळे राज्यातील पोलिसांची काही काळ झोप उडाली. साताऱ्यात काही दहशतवादी असून त्यांच्याकडे रडार असल्याची माहिती फोनवरून मिळाल्याने मध्यरात्रीपासूनच यंत्रणा कामाला लागली. फोन करणाऱ्याचा शोध लागल्यानंतर तपासात सर्व बाबींचा उलगडा झाला आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
पंतप्रधान पुढील आठवड्यात सातारा दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवजयंती दिनी (दि. १९ फेब्रुवारी) सातारा दौऱ्यावर येणार आहेत. राजघराण्याच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना पहिला ‘शिवसन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या दौऱ्याची सध्या तयारी सुरू असतानाच साताऱ्यात दहशतवादी असल्याचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. तसेच काही तरी भयंकर घडणार असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितल्याने पोलीस अलर्ट झाले.
मध्यरात्री आलेल्या फोनमुळे खळबळ
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला साताऱ्यात काही दहशतवादी असून, त्यांच्याकडे रडार आहे, असा फोन शुक्रवारी मध्यरात्री आला. खूप मोठे काही तरी घडणार असल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. त्यामुळे पोलिस यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली. मुंबई पोलीस मुख्यालयातून तातडीने मुंबई गुन्हे शाखा तसेच सातारा पोलिस आणि रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना माहिती देऊन अलर्ट करण्यात आले.
फोन करणारा निघाला मानसिक रोगी
पोलिसांनी पहिल्यांदा फोन करणाऱ्या व्यक्तीला मुंबईतील टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताच्या नातेवाइकांशी पोलिसांनी संपर्क साधला. फोन करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तेव्हापासून त्याची मानसिक संतुलन बिघडलं असल्याची माहिती त्या व्यक्तीच्या जावयाने दिली. तसेच ती व्यक्ती मुंबईमध्ये बहिणीकडे राहत असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. हा सर्व गुंता सुटल्याने पोलिसांनी अखेर सुटकेचा निःश्वास टाकला.