कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड येथील शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. 1966 ते 2022 पर्यंतच्या सुमारे 800 विद्यार्थ्यांनी यावेळी स्नेहमेळाव्यास उपस्थिती लावली. यावर्षीचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा गेल्या दहा वर्षातील पहिलाच मोठा स्नेह मेळावा ठरला. अबू चे कॅन्टीन, वसतिगृह, वर्ग खोल्या तसेच क्रीमरोल व चहा यांच्या सानिध्यात माजी विद्यार्थ्यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयाचे नियामक मंडळाचे अध्यक्ष माजी विद्यार्थी श्री. मोरेश्वर भालसिंग, राज्य साहित्य परिषद पुणेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. मिलिंद जोशी तसेच श्री. नरेंद्र जोशी (सेवानिवृत्त कार्यकारी अध्यक्ष थरमॅक्स लिमिटेड), आयआयएम नागपूरचे श्री. भिमराया मैत्री, अक्षयपात्र संस्था, प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. श्रीधर व्यंकट, बजाज इलेक्ट्रिकल्सचे प्रमुख तांत्रिक अधिकारी श्री. आनंद जोशी उपस्थित होते.

या कार्यक्रमास देश विदेशातून अनेक विद्यार्थांनी उपस्थिती लावली होती. सदर स्नेह मेळाव्यास उपस्थित माजी विद्यार्थ्यांना संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री मोरेश्वर भालसिंग तसेच संस्थेचे प्राचार्य डॉ. श्री विनायक कुलकर्णी यांनी संबोधित केले. तसेच संस्थेच्या भविष्यातील आराखड्याबद्दल माहिती दिली. प्रा. उमा पाटील यांनी संस्थेस देणगी दिलेल्या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमात पुढे संस्थेत नव्याने स्थापन झालेल्या सीईके रुरल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनचे उद्दिष्ट सदर फाउंडेशनचे संचालक प्रा. धनंजय सटाले यांनी सांगितले. या फाउंडेशनचे मूळ उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी व संस्थेच्या पायाभूत सुविधांकरिता निधी उभारणे हे आहे. या फाउंडेशनच्या मार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड मधील विद्यार्थी, महाविद्यालयातील संशोधनात्मक प्रकल्प माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने व कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मार्फत कसे करू शकतील याबद्दल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमात संस्थेच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागात कार्य करणाऱ्या प्रा. पौर्णिमा कावलकर, प्रा. सौरभ यादव, प्रा. स्वालिया कागदी, प्रा. रोहित थोरवडे, प्रा. सत्यजित पोरे, प्रा. प्रियांका पाटील, प्रा. उत्कर्षा घाडगे, प्रा. सोनाली पाटील यांना त्यांच्या कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक उमा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.