सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी ‘अमृत’ या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन अमृतच्या संचालिका तथा विभागीय पालक अधिकारी अस्मिता बाजी यांनी केले.
सातारा येथे नुकताच संवाद मेळावा पार पडला. त्या म्हणाल्या, ‘राज्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु ज्या अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही विभाग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही. अशा अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. अमृतच्या विविध योजनांचा प्रसार, प्रचार करणे व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा येथे घेण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा समन्वयक अधिकारी महेश कोरडे, सातारा तालुका समन्वयक प्रमोद पंचपोर, कोरेगाव तालुका समन्वयक जीवन जाधव, वाई तालुका समन्वयक प्रशांत सुतार, फलटण, बारामती, माळशिरस समन्वयक आनंद इनामदार तसेच जिल्ह्यातील विविध भागातून लाभार्थी उपस्थित होते. याच बरोबर सायली मुतालिक, विराज कुलकर्णी, अॅड. सन्मान आयाचित, रोहित साने आदी मान्यवरांनी उपस्थिती होते.
लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, अर्थिक विकासाकरीता स्वयम रोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे, याच बरोबर कृषी उत्पन्न आधारित उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देणे, कौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधने इत्यादी योजना ‘अमृत’ मार्फत रबिवल्या जात आहेत, असे सांगून त्यांनी या योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.