सातारा प्रतिनिधी | काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत माण विधानसभा मतदारसंघाची मागणी अनेकवेळा झाली असून, बुधवारीही माढा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त केंद्रीय निरीक्षकांकडेही माणची मागणी जोरदार करण्यात आली. तसेच या मतदारसंघात काँग्रेस लढली तर विजयी होईल. पण, भाजप परत दिसणारही नाही, असा दावाही करण्यात आला. यामुळे माण मतदारसंघ काँग्रेसला मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीतूनही जागा वाटपावर भर देण्यात येत आहे. पण, अजूनही सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या काही मतदारसंघाबाबत आघाडीत संभ्रमावस्था आहे. काँग्रेसने तीन मतदारसंघावर दावा केला आहे. तर उद्धव सेनाही निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मंगळवारीच इच्छुकांच्या मुलाखती पार पाडल्या. काँग्रेसही अधिक जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे.
असे असतानाच माढा लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निरीक्षक व गुजरातमधील आमदार अमरित ठाकूर यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीत माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, सरचिटणीस नरेश देसाई, रणजितसिंह देशमुख, प्रा. विश्वंभर बाबर, डाॅ. महेश गुरव आदी उपस्थित हाेते.
बैठकीत केंद्रीय निरीक्षक ठाकूर यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. यामध्येच माण मतदारसंघातील पदाधिकारी आक्रमक आणि मुद्देसूदपणे मांडणी करत होते. माणमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्येच लढाई आहे. यामध्ये भाजप पराभूत होईल. कारण, काँग्रेसने अनेक निवडणुका लढवून जिंकल्या आहेत. काँग्रेस मजबूत असल्याने पहिल्याच यादीत माणच्या उमेदवाराचे नाव जाहीर करावे. विजयाची जबाबदारी आमची, असेही स्पष्ट करण्यात आले.