अमृत कलश यात्रा उद्या साताऱ्यात; जिल्ह्यातील 11 तालुक्यातून येणार कलश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण देशभर आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’मध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व तालुकास्तरावरुन उद्या सोमवार, दि. १६ रोजी अमृत कलश यात्रा साताऱ्यात येणार आहे. यावेळी लोकप्रतिनधी, अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उद्या सोमवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेत सर्व ११ तालुकास्तरावरुन आलेल्या अमृत कलशचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्याकडे अमृत कलश सुपूर्द केला जाईल. तसेच यावेळी माणदेशी गजीनृत्याचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी साडे आठला जिल्हा परिषद ते पोवई नाकापर्यंत चित्ररथमधून अमृत कलश यात्रेची मिरवणूक निघेल. यामध्ये झांजपकथक, ढोल ताशा, पोवाडा गायन असणार आहे.

सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोवई नका येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. तसेच पंचप्रण प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. साडे नऊला पालकमंत्री, जिल्हाधिकारी आदींच्या उपस्थितीत ११ तालुक्यांच्या अमृत कलशचे पूजन आणि तालुक्यातील युवकांना तो सुपूर्द करण्यात येणार आहे. सकाळी दहाला जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होऊन सांगता होणार आहे.