अमरावती पोलिसांची कराड तालुक्यात छापेमारी; शंभराच्या 31 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

0
6

सातारा प्रतिनिधी | अमरावतीच्या चांदूर रेल्वे शहरात सापडलेल्या शंभर रूपयांच्या बनावट नोटांच्या रॅकेटचे धागेदोरे सातारा जिल्ह्यात पोहोचले आहेत. अमरावती पोलिसांनी मसूर (ता. कराड) गावातील दोन संशयितांच्या घरावर छापा मारून शंभर रूपयांच्या ३१ बनावट नोटा जप्त केल्या. नितीन चंद्रकांत जाधव आणि सूरज मारूती धस, अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघांवर खून, खुनाच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.

नेमकी घटना काय?

अमरावतीमधील चांदर रेल्वे शहरात २ जानेवारी रोजी रात्री एलसीबी पथक पेट्रोलिंग करत असताना आठवडी बाजारात फिरणाऱ्या अंकुश गुलाबराव सोनकुवर (रा. सांगूलवाडा, ता. चांदूर रेल्वे) या तरूणाला पोलिसानी संशयावरून ताब्यात घेतल असता त्याच्याकडे शंभर रूपयाच्या ७ बनावट नोटा आढळल्या होत्या. बनावट नोटा आणि मोबाईल जप्त करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिसांच्या तपासात बनावट नोटांच्या रॅकेटचे धागेदोरे सातारा जिल्ह्यात असल्याचं समोर आलं.

अमरावती पोलिसांचा कराड तालुक्यात छापा

बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये मसूर (ता. कराड) गावातील दोघांचा सहभाग असल्याची माहिती तपासात समोर आली. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सुयोग महापुरे यांच्या पथकाने मसूरमधील नितीन चंद्रकांत जाधव आणि सूरज मारूती धस या दोन संशयितांच्या घरावर छापे मारून शंभर रूपयांच्या ३१ बनावट नोटा जप्त केल्या. त्यांना अटक करण्यात आली. न्यायाललाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

दोघांच्या अटकेनं तपासाला गती

बनावट नोटांच्या रॅकेटमधील दोघांना अटक झाल्यानं पुढील तपासाला गती आली आहे. बनावट नोटा कुठे छापल्या जात होत्या? त्या कुठे कुठे आणि कशा पध्दतीने बाजारात खपविण्यात आल्या? याचा तपास चांदूर रेल्वे पोलीस करत आहेत. तसेच शंभर रूपयांच्या बनावट नोटा कराड तालुक्यातही खपवण्यात आल्या असल्याचा संशय पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे यांनी व्यक्त केला आहे.