सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, कराड तालुक्यातील ‘या’ गावच्या सुपुत्राकडं कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याचं पद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्याच जागेवरील अमोल येडगे यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अमोल येडगे हे मूळचे कराड तालुक्यातील आबईनगर गावचे आहेत. ते २०१४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून त्यांनी जळगावमध्ये प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला होता. त्यानंतर कळमनुरी (जि. हिंगोली) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली होती. आयटीडीपीचे प्रकल्प संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर ते बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

डिसेंबर २०२० मध्ये अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते रुजू झाले होते. त्यानंतर त्यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, आतापर्यंतच्या कार्यकाळात अमोल येडगे कधीही वादग्रस्त ठरलेले नाहीत. उलट त्यांनी कामगिरी दमदार राहिली आहे.

मेंढपाळाचा मुलगा बनला आएएएस

कराड तालुक्यातील आबईनगर हे अमोल येडगे यांचे मूळ गाव. 2014 साली ते आयएएस झाले. दिल्लीत राहून त्यांनी युपीएससीचा अभ्यास केला. कोणतीही पार्श्वभूमी नसताना एका धनगर समाजातील मुलाने युपीएससी उत्तीर्ण होणे, ही मोठी घटना होती. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांची गावातून जंगी मिरवणूक काढली होती. प्रशासकीय कामाला सुरुवात केल्यानंतर उपेक्षितांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली. बीडमधील ऊसतोड मजूर त्यांच्या कामाचे आजही कौतुक करतात.