सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई येथील चित्रा टॉकीजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पार पाडली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या उमेदवारावर सडकून टीका केली. आपल्या समोर महायुतीचा उमेदवार कितीही तगडा आणि मातब्बर असला, तरी त्याला घरपोच करण्याची मनात इच्छा आणि आपली एकजूट असेल, तर वाई विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा असे म्हणत गुलाबी जॅकेट घालणाऱ्यांनी गुजरातच्या गुलामगिरीची झूल पांघरली,” अशी टीका नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
वाईत झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेस प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी सेलचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला अध्यक्षा संजना जगदाळे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी खासदार कोल्हे म्हणाले, ”शरद पवार यांची साथ सोडून विकासासाठी सत्तेत गेलेल्या विद्यमान आमदारांनी अडीच वर्षांत विकास झाला, तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अनेक फसव्या योजना का जाहीर केल्या, याचे उत्तर द्यावे.
जयंत पाटील म्हणाले, ”राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतरही शरद पवार यांच्या नेतृत्वाला नवीन पिढीची साथ मिळाल्याने लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर विजय मिळाला. सातारा लोकसभा मतदारसंघात ‘पिपाणी’ चिन्हाने घात केला नाहीतर विजय निश्चित होता. तरीही प्रस्थापितांच्या विरोधात चांगले मताधिक्य मिळाले. त्यामुळे महायुती सरकार गोंधळले आहे. त्यांनी अडीच वर्षांत विकासाच्या पोकळ घोषणा आणि निवडणुकीच्या तोंडावर अनेक फसव्या योजना जाहीर करून राज्याची तिजोरी मोकळी केली असल्याचे पाटील यांनी म्हटले. यावेळी महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी अभिनेत्री अश्विनी प्रदीपकुमार महांगडे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी मेहबूब शेख, सुनील गव्हाणे यांची भाषणे झाली.