सातारा प्रतिनिधी । भाजपच्या उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांची राज्यसभेची अजून अडीच वर्षे बाकी आहेत, त्यामुळे शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) निवडून दिल्यास साताऱ्याला दोन खासदार मिळतील, अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे उदयनराजेंवर निशाणा साधला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी वाई विधानसभा मतदारसंघातील पाचवड येथे सभा पार पडली. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर खिल्ली उडवली. लोकसभेच्या निमित्ताने इतरांना एक खासदार निवडण्याची संधी असताना सातारकरांना मात्र एकाचवेळी दोन खासदार निवडण्याची संधी आहे.एक खासदार जे छत्रपतींचे वारसदार आहेत, त्यांचे अडीच वर्ष बाकी आहेत. दुसरे शशिकांत शिंदे हे लोकसभेत जनतेतून निवडून जातील.
सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून उदयनराजे आणि राष्ट्रवादी शरद पवारांकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही जागा शरद पवारांच्या प्रतिष्ठेची जागा असल्याने पवारांनी या ठिकाणी अनेक सभा घेतल्या आहेत. त्याचवेळी भाजपनेही यावेळी सातारा मतदारसंघ हा कोणत्याही परिस्थितीतून राष्ट्रवादीकडून काढून घ्यायचा असा चंग बांधला आहे.