कराड प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा हरियाणा करू अशी भाषा करत आहेत. परंतु त्यांच्या हेही लक्षात आहे की हे करत असताना महाराष्ट्रात शरद पवार यांच्यासारखी व्यक्ती पहाडासारखी उभी आहे. ते महाराष्ट्रातील जनतेचे सह्याद्री आहेत. त्यामुळे पंतप्रधान कितीही म्हणत असले तरी महाराष्ट्राचा हरियाणा होणार नाही, हे त्यांनाही माहित आहे. बटेंगे तो कटेंगे सारख्या नरेटिव्हला महाराष्ट्र थारा देणार नाही, असा विश्वास खा. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
खासदार अमोल कोल्हे यांनी मंगळवारी कराड विमानतळावर मध्यमानशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी खा. अमोल कोल्हे म्हणाले, उद्धव ठाकरे तसेच माझ्याही बॅगची तपासणी करण्यात आली होती. नियम सगळ्यांना समान असावेत. सर्वांना समान न्याय लागायला हवा. परंतु तसे होताना दिसत नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी १६५ पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल.
बटेंगे तो कटेंगेची विषारी बीजे रोवण्यासाठी येथील माती भुसभुशीत नाही. हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे. येथे अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे केले. त्यामुळे सर्वधर्मसमभाव येथील मातीत व येथील माणसांच्या मनात तसेच विचारात असल्याचे खा. कोल्हे यांनी सांगितले.