सातारा प्रतिनिधी | राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष व अजितदादांचे कट्टर समर्थक असलेल्या अमित कदम यांनी रविवारी सातार्यात खा. शरद पवार यांची भेट घेतली. काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा केल्यानंतर अमित कदम यांनी पवारांकडे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या कार्याध्यक्षासह महत्वाच्या निवडी केल्या होत्या. त्यामध्ये जिल्ह्यात पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्व. आमदार जी. जी. कदम यांचे चिरंजीव अमित कदम यांच्यावर सोपवली होती. नुकताच मेढा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कदम यांनी सातारा-जावली विधानसभा मतदारसंघासाठी लढणार असल्याचे जाहीर केले होते. दुसर्याच दिवशी कदम यांनी थोरल्या पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
त्यानंतर रविवारी साताऱ्यात खा. शरद पवार जेव्हा आले तेव्हा अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष अमित कदम यांनी त्यांची भेट घेतली. भेटीनंतर कदम यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, खा. शरद पवार यांच्या विचारांशी निगडित राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम केले.
पक्षाची विचारधारा कधीही सोडली नाही. त्याच अनुषंगाने मेढ्यात मेळावा घेतला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी सातारा – जावली विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी केली आहे. संधी मिळेल तिथून उभे राहायचे आहे, असे मी खा. शरद पवारांना सांगितले.
मला संधी दिली तर मूळचा राष्ट्रवादीचा हा मतदारसंघ पुन्हा अभेद्य ठेवण्याचे काम मी करेन. तुमचा हा निर्णय ना. अजित पवारांना पटेल का? असे विचारले असता कदम म्हणाले, राजकीय भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे, या विचाराचा मी आहे. चिपळून येथे अजित पवार यांना भेटूनही मी माझी भूमिका सांगितली आहे. राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच भाजपच्याविरोधात संघटन केले आहे. या संघटनेला बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, याबाबत पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण माझ्या म्हणण्याला नकारही दिला नाही. माझे स्वच्छ मत मी पवार यांच्यापुढे मांडले आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला लढावेच लागणार आहे, असे कदम यांनी सांगितले.