सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना सहलीच्या माध्यमातून अनेक गोष्टींची मिळावी, हा मुख्य उद्देश सहलीमागचा असतो. येत्या १४ फेब्रुवारी रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंगळूर येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO) अभ्यास सहलीसाठी जिल्हा परिषद शाळांतील निवडक प्रतिभावान व गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा शिष्यवृत्ती उत्तीर्ण सर्वसाधारण गटातील 41 विद्यार्थी यासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये खटाव तालुक्यातून एकमेव राजापूर जिल्हा परिषद केंद्रशाळेचा सहावीतील विद्यार्थी अमेय विकास फडतरे हा पात्र ठरला आहे.
बंगळूर येथे जाणाऱ्या या शैक्षणिक अभ्यास सहलीमध्ये बंगळूर येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. त्यामध्ये अमेयचा देखील समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही अनोखी पर्वणी असून या निवडीबद्दल अमेय फडतरे व राजापूर शाळेतील शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांनी विशेष अभिनंदन केले. शालेय वयात इस्रोच्या भेटीमुळे या विद्यार्थ्यांना मोठी वैज्ञानिक प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेय फडतरवाडीच्या (बुध) सरपंच सौ. प्रियंका फडतरे यांचा चिरंजीव आहे.
या निवडीबद्दल अमेय तसेच त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक विनोद गोडसे, दीपक घनवट, सुवर्णा घनवट, धनश्री तापोळे यांचे शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, सोनाली विभुते, केंद्रप्रमुख एस. के. जाधव, मोहनराव साळुंखे, मुख्याध्यापक नितीन खोत, राजापूरच्या सरपंच सौ. वनिता पवार, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप घनवट, राजेंद्र घाटगे, हणमंत घनवट, दशरथ घनवट, नारायण घनवट, जोतीराम घनवट, राजापूर व फडतरवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.