महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट अवजड वाहतुकीसाठी महिनाभर राहणार बंद

0
203
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट अवजड वाहनांसाठी महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीच्या वेळी आणि अतिवृष्टीच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणातून महाबळेश्वरकडे जाणारा महत्वाचा मार्ग बंद झाला आहे.

काही दिवसांपूर्वी अंबेनळी घाटात मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र १५ ऑगस्ट पर्यंत या मार्गावरील अवजड वाहनासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाबळेश्वर तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाची अधूनमधून चांगलीच बॅटिंग सुरु आहे. या पावसामुळे तालुक्यातील दुर्गम बिरमणी गावाकडे जाणार्‍या पुलावर कोयना नदीचे पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.

महाबळेश्वर- कोकणाला जोडणार्‍या आंबेनळी घाट रस्त्यावर पोलादपूर हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळून मलबा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे आंबेनळी घाटामधून वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरु होण्यास विलंब लागणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. त्यातच दुर्गम गावे व अंबेनळी घाटात दरडी कोसळण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. अंबेनळी घाटातील रस्त्यावर दरड कोसळल्याने घाटातील रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. तहसिलदार सचिन मस्के यांनी या घाटरस्त्यावरील वाहतूक अगोदरच बंद केली आहे. याचा आढावा मस्के यांनी मंगळवारी घेऊन कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांना सूचना दिल्या. याचबरोबर बिरामणी गावातील पुलावर पाणी आल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.

गेल्या काही दिवसात या मार्गावर सात ते आठ ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. महाबळेश्वर खोरे आणि पोलादपूर परिसरात पावासाचा जोर वाढला असल्याने, या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे.

या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रवाश्यांच्या सुरक्षेचे कारण देत पावसाळा संपेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हवामान विभागाकडून पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या काळात हलक्या वाहनांसाठी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.