सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजितदादांनी जरांगे-पाटलांना संविधान पाळा, असे सांगणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत. जरांगे-पाटलांनी घेतलेल्या भूमिकेचे अजितदादांनी कौतुक केले पाहिजे. त्यांच्या भूमिकेचा अजितदादांनी अवमान करू नये, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला. साताऱ्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा आरक्षणाला शिवसेनेचा नेहमीच पाठिंबा
राज्य सरकारला मराठा आरक्षण द्यायचे आहे की समाजामध्ये भांडणे लावायची आहेत, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. मराठा आरक्षणाला शिवसेनेने सातत्याने पाठिंबा दिला असल्याचेही दानवे म्हणाले. लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यात चाचपणी झाली आहे. उमेदवारीचे चित्र चार आठवड्यांमध्ये क्लियर होईल. शिवसेना ही फिनिक्स पक्षासारखी भरारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाबरी पाडताना कोणी शेपूट घातले होते?
अयोध्येमध्ये बाबरीचा ढाचा पाडण्यात कोण आघाडीवर होते आणि कोणी शेपूट घातले होते, हे सर्वज्ञात आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे छातीठोकपणे सांगितले होते. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा भाजपने शिवसेनेला शिकवू नये, असा टोला टीका अंबादास दानवे यांनी लगावला.
राम मंदिर संपूर्ण देशाचे
राम मंदिर हे अयोध्या पुरते मर्यादित नाही. ते संपूर्ण देशाचे मंदिर आहे. बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेने सक्रिय भूमिका घेतली होती, तर शेमफुल थिंग म्हणून डोलणारे कोण होते, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे भाजपने आपणच सर्व काही केले असा आव आणू नये. आम्ही देखील काळाराम मंदिरात जाऊन आरती करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.