अलमास मुलाणींचे जगातील सर्वात खडतर अशा ‘अल्ट्रामॅरेथॉन’ स्पर्धेत यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | प्राथमिक शिक्षिका असलेल्या अलमास मुलाणी यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेली अत्यंत प्रतिष्ठेची कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली. जगातील सर्वात खडतर अन् जुनी अल्ट्रामॅरेथॉन म्हणून ओळखली जाणारी सुमारे 88 किलोमीटरची ही स्पर्धा त्यांनी 11 तासांत यशस्वी केली. त्यात त्यांनी देशातील पहिल्या पाच महिला स्पर्धकांत येण्याचा मान मिळवून उत्तम कामगिरी केली आहे.

शिक्षिका मुलाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मॅरेथॉनकडे वळल्या. त्यात प्राविण्य संपादन करताना आतापर्यंत अनेक मॅरेथॉन स्पर्धांत त्यांनी यश पटकाविले आहे. सलग 72 किलोमीटर धावणे, सलग 73 किलोमीटर सायकलिंगची किमयाही त्यांनी साधली आहे. आयर्न वुमनचा बहुमानही त्यांनी पूर्ण केला आहे. पोहणे क्रीडा प्रकारातही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. यासाठी त्यांना लोणंदचे आयर्नमन मनोज चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

कॉम्रेडस मॅरेथॉन सुमारे 88 किलोमीटर अंतराची अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धा. ती दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलू नाताळ प्रांतात आयोजिण्यात येते. डर्बन ते पीटरमॅरिटझबर्ग शहरांदरम्यान या शर्यतीचा मार्ग आहे. ही जगातील सर्वात मोठी अन् सर्वात जुनी अल्ट्रामॅरेथॉन शर्यत म्हणून ओळखली जाते. जगभरातील 132 देशांचे स्पर्धक त्यात सहभागी झाले होते.