सातारा प्रतिनिधी | जालना येथील आंदोलन करत असलेल्या मराठा समाज बांधवांच्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली. मराठा क्रांतीच्या हाकेला संपूर्ण जिल्हा धावून गेला. जिल्ह्यात सातारा, कराड, पाटणसह फलटण येथील विविध व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत पाठींबा दिला. या आजच्या बंदमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा, लाख मराठाची एकजुटीची मूठ घट्ट असलेली पहायला मिळाली.
सातारा जिल्ह्यात सकाळ पासूनच व्यावसायिकांनी दुकाने, खासगी वडाप वाहतूकदार, एसटी प्रशासनाने आपली वाहने जागेवरच ठेवत बंदला पाठिंबा दिला. सातारा शहरातील भाजीमंडई वगळता सातारा शहरात सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. बंदच्या पार्श्वभुमीवर सातारा येथील पोवई नाक्यावर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. जिल्हा बंदमुळे सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट होता. सातारा एसटी आगारातही शुकशुकाट जाणवत होत्या.
सातारा जिल्ह्यात पुन्हा अवतरला 'एक मराठा, लाख मराठा'…;मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा जिल्ह्यात कुठं – कुठं नेमकं काय घडलं…
🧐 पोलिस अधीक्षक समीर शेख काय म्हणाले पहा Video 👉 pic.twitter.com/GDHBEnSasb
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 4, 2023
तथापी, केवळ शहरातील एसटी फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या तर ग्रामीण भागातील तसेच लांब पल्ल्याच्या एसटी फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला सकाळी ९ वाजता पोवई नाक्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन केल्यामुळे पोवई नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला होता. यावेळी एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या.
पोलिस अधीक्षक समीर शेख पोवई नाक्यावर…
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानजिक जमले. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कायदेशीर मार्गाने निवेदन सादर करण्याचे आवाहन केले. यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी पोलिस अधीक्षक शेख यांच्याशी चर्चा केली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाज हा सर्व समाज घटकांना बरोबर घेवून जाणारा आहे. कोणाचेही आरक्षण हिरावून न घेता केवळ या समाजाला आरक्षण द्यावे आणि मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
बंदमुळे सातारा एसटी स्टॅण्ड परिसरात शुकशुकाट…
जालन्यातील मराठा आंदोलकावर लाठीमाराच्या घटनेनंतर सातारा बंद पुकारण्यात आल्यामुळे सातारा एसटी स्टँड परिसरा एसटी बसेस उभ्या करण्यात आल्या. त्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट पहायला मिळाला. परिणामी जे प्रवासी बाहेरगावावरुन आलेले होते त्यांची मोठी गैरसोय झाली. शहरी भागातून ग्रामीण भागाकडे जाण्यासाठी एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या. तसेच एसटी स्टँडमधून बाहेर पडलेल्या प्रवाशांना पायी चालत जावे लागले. या बंदमुळे एसटी महामंडळाला याचा फटका बसला आहे. शिवाय प्रवाशांनाही एसटी बंद असल्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळाले.
कराडला दुकानांची शटर डाऊन तर लालपरीची चाकेही थांबली
आज मराठा क्रांती मोर्च्याच्या बंदला पाठवा दर्शवत कराड शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली. या जिल्हा बंदला कराड शहरासह तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. दुकानदार व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने व्यवसाय बंद ठेवून या बंदला प्रतिसाद दिला. तर कराड एसटी आगारात लालपरीची चाकेही थांबली. सकाळपासून कराड आगारात लांब पल्ल्याच्या गाड्या वगळता ग्रामीण भागातील एस्टी बसेसची वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली.
फलटणला चक्काजाम…
फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात जालना येथील आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा सकल क्रांती मोर्चाच्या वतीने चक्काजाम करण्यात आला. त्याला शहरवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन आंदोलनास पाठिंबा दर्शवला.
कराडला महाविद्यालय बंद, विद्यार्थ्यांचे हेलपाटे
आजच्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदचा फटका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगलाच बसला. विद्यार्थी शाळा तसेच कॉलेजासाठी आज सकाळपासूनच कराडला दाखल झाले होते. शाळा कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना आज बंद मुळे सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे कळाले त्यामुळे त्यांना विनाकारण हेलपाटा घालावा लागला. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोमवारी सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज आज बंद ठेवण्यात आले. मात्र त्याची माहिती ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना मिळाली नसल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
म्हसवड शहरात कडकडीत बंद…
जालना घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असताना म्हसवड शहरातही या घटनेचा निषेध म्हणुन पुकारण्यात आला. म्हसवड बंद ला म्हसवडकरांनी उत्फुर्तपणे पाठींबा दर्शिवत शहरात कडकडीत बंद पाळला. तर माण तालुक्यातील अनेक गावांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले. माण तालुक्यात सर्वात मोठे शहर म्हणुन म्हसवड शहराची ओळख आहे. या शहरातही मराठा समाज बांधवांनी रोजी बंद ची हाक दिली होती त्या हाकेला म्हसवडकरांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहिल्याने शहराचे मुख्य रस्ते ओस पडल्याचे दिसुन आले तर म्हसवडकरांनीही बंद मध्ये सहभागी होत जालना घटनेचा निषेध व्यक्त केला.