कराड प्रतिनिधी | कराड येथे आज सकाळी सर्वपक्षीय संघटनांआणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्व पक्षीय संघटनांच्यावतीने ईव्हीएम रद्द करून त्याऐवजी मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे, अशी मागणी कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, व्ही. आर. धोरवडे यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आनंदराव लादे म्हणाले की, देशात निवडणुकीच्यावेळी मतदानासाठी जो ईव्हीएम मशीन वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो चुकीचा आहे. ईव्हीएमद्वारे मत दिल्यानंतर आमचे मत चोरीला जात आहे. त्यामुळे ईव्हीएम यंत्राद्वारे घेतल्या जाणाऱ्या मतदानाला देशातील नागरिकांचा विरोध आहे.
ईव्हीएम द्वारे मतदान घेऊ नये, त्याऐवजी बॅलेट पेपर वरूनच मतदान घेतले जावे अशी आमची मुख्य मागणी आहे आणि या मागणीसाठीच आज आम्ही सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्रित आले आहोत. तसेच आम्ही एक राष्ट्रपती महोदयांना निवेदन देखील लिहले असून ते प्रांताधिकारी यांना दिले आहे. आमच्या मागण्यांचा विचार जर नाही केला आणि सरकारने यापुढे ईव्हीएमवर मतदान घेतल्यास ईव्हीएम मशीन फोडले जाईल, असा इशारा लांडे यांनी यावेळी दिला.
यावेळी व्ही. आर. थोरवडे यांनी देखील आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ईव्हीएम मशीनमुळे निवडणूक प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडायची असेल तर ईव्हीएम यंत्राद्वारे घेतले जाणारी मतदान प्रक्रिया बंद करणे आवश्यक आहे. तसेच त्याऐवजी मतदान पत्रिकेवरूनच मतदानघ्यावे. जेणेकरून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राहील.