कराड प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा विविध पत्रकार संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला. दरम्यान, अखिल मराठी पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाच्यावतीने देखील बावनकुळे यांचा नुकताच निषेध करण्यात आला. तसेच बावनकुळे हे कराड दौऱ्यावर यापुढे केव्हाही येतील त्यावेळी त्यांनी पत्रकारांबाबत केलेल्या या अपमानकारक वक्तव्याबाबत त्यांना याठिकाणी रोखठोक जाब विचारण्यात येईल असा निर्धार करत इशारा यावेळी कराडच्या पत्रकारांच्यावतीने देण्यात आला.
यावेळी अखिल मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोवेकर, सचिव अतुल होणकलसे, कार्याध्यक्ष दिनकर थोरात, शहर अध्यक्ष सौ. प्रगती पिसाळ, उपाध्यक्ष सुहास पाटील, हरून मुलाणी, विकास साळुंखे, प्रकाश पिसाळ, तालुक्याचे पदाधिकारी कैलास थोरवडे, सागर दंडवते आदी उपस्थित होते.
नेमकं काय म्हणाले होते बावनकुळे?
अहमदनगर येथे रविवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल दिलेल्या ‘कानमंत्रा’ची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. “ज्या बूथवर तुम्ही काम कराल, तेथील पत्रकारांची यादी तयार करा, महाविजय 2024पर्यंत आपल्याविरोधात काही येणार नाही, याची काळजी घ्या. या पत्रकारांना महिन्यातून धाब्यावर न्या, एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे हे समजले असेल,” असा सल्ला बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.