अजितदादांच्या बैठकीत कराडमधील युवा संघटकाची उपस्थिती; विजयसिंह यादवांनी कराडातील राजकीय परिस्थितीची दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सातारा जिल्ह्यातील बैठकीत अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीला कराडमधील युवा संघटक विजयसिंह यादव यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. एकेकाळी खासदार उदयनराजेंचा कट्टर मावळा म्हणून ओळख असलेल्या विजयसिंह यादव यांनी कराडमधील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. तसेच अजितदादा गटातून सक्रिय झाल्याचे देखील यानिमित्ताने त्यांनी दाखवून दिले आहे. ऐन निवडणुकीत उदयनराजे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानावा लागेल.

अजितदादांसोबत झालेल्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील आणि खास करून कराड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. त्यात विजयसिंह यादव यांनी कराड शहरातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीसाठी ते सक्रिय झाल्यामुळे उदयनराजे समर्थकांच्या गोटात खळबळ माजली आहे. त्यांचे बंधू राजेंद्रसिंह यादव हे उदयनराजेंचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यादव बंधू आता उदयनराजे आणि अजितदादा, अशा दोन गटात विभागले गेले आहेत.

एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडून भाजपबरोबर गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. तेव्हापासून माजी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव हे मुख्यमंत्र्यांच्या गोटात गेले आहेत तर त्यांचे बंधू विजयसिंह यादव यांनी अजितदादा गटाचे काम करण्याचा निर्णय घेतला. अजितदादांच्या कराड दौऱ्यात विजयसिंह यादव यांची अजितदादांशी असणारी जवळीकता पाहायला मिळते. १२ मार्च रोजी विजयसिंह यादव कराडच्या प्रीतिसंगमावर अजितदादांबरोबर दिसून आले होते.