धाकल्या पवारांच्या दौऱ्यात थोरल्या पवारांच्या गटातील ‘छुपे रूस्तम’ उघड होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताची जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्वागताचे बॅनर झळकले आहेत. बॅनर्सच्या माध्यमातून अनेक राजकीय पुढाऱ्यांची भूमिका उघड झाली असून काही छुपे रुस्तम उद्या प्रत्यक्ष दौऱ्यावेळी समोर येणार आहेत.

अजित पवार हे भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रात दुसरा राजकीय भूकंप झाला. अजितदादा थेट उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. आता पक्षावर दावा सांगण्यापर्यंत अजितदादा गटाची मजल गेली आहे. एकंदरच शिवसेनेतील फुटी नंतरच्या घडामोडींचाच ट्रेलर सध्या राष्ट्रवादीच्या संदर्भात पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात स्वागताची जय्यत तयारी

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार रविवारी पहिल्यांदाच साताऱ्यात येत आहेत. या निमित्ताने त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे फोटो झळकले आहेत, तर उद्या प्रत्यक्ष अजितदादा सातारा आणि कराडमध्ये दाखल होतील. त्यावेळी काही जण त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार असल्याचे समजते.

नेत्यांची भूमिका धाकापोटी की मनापासून

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित दादांनी आक्रमक रणनीती आखायला सुरुवात केली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील यांनी अजितदादांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. खासदार श्रीनिवास पाटील आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी आम्ही शरद पवार साहेबांसोबतच राहणार,असे जाहीर केले. आता स्थानिक पदाधिकारी ओपन होऊ आहेत. मात्र त्यांनी घेतलेली ही भूमिका मनापासून की अजित दादांच्या धाकामुळे, याची देखील खमंग चर्चा ऐकायला मिळत आहे.

अजितदादांच्या स्वागताला कोण-कोण येणार?

अजित पवार हे सातारा आणि कराड शहरात दाखल झाल्यानंतर यांचे भव्य स्वागत होणार आहे यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित राहून त्यांचे स्वागत करणार आहेत. त्यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांची भूमिका आणि राजकीय वाटचाल स्पष्ट होणार आहे.