कराड प्रतिनिधी | सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे. अशात सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कराड येथे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये कराड दक्षिणेतील महायुतीत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले तसेच जोपर्यंत मान सन्मान दिला जात नाही तोपर्यंत कोणाच्याही स्टेजवर जायचं नाही, अशी भूमिका कराड दक्षिण नितीन महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा शनिवारी मेळावा पर पडला. या मेळाव्यात राजाभाऊ पाटील- उंडाळकर, इंद्रजित भोपते, विकास शेवाळे, संदीप मुटल यांनी मार्गदर्शन केले. तर तालुकाप्रमुख विकास यादव, पंकज जाधव, सुहास कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार यांच्या आदेशानंतर आम्ही दोन दिवसांत आमची भूमिका जाहीर करू, अशी माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली. अॅड. राजाभाऊ उंडाळकर म्हणाले, “लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णायक मतांमुळे झाला. विधानसभेला कराड दक्षिणचाही विजय आमच्याच निर्णायक मतांमुळे होणार आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मित्र पक्षाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. या भूमिकेला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी मेळावा आयोजित केला असल्याचे सांगितले.