कराड प्रतिनिधी | जिल्ह्याला महायुतीमधून नवनिर्वाचित तीन चेहरे आमदारकीच्या माध्यमातून मिळाले. आता महायुती मधील आठ आमदारांपैकी सात जणामध्ये मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यामध्ये मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना कराडात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी आलेलया अजित पवार यांनी नवीन मंत्रिमंडळातील मंत्रीपदाबाबत महत्वाचं विधान केलं आहे. “साताऱ्याला निश्चितपणे मंत्रिपद मिळेल, माझं साताऱ्याकडे कायम लक्ष राहिलं आहे. मी साताऱ्याचा पालकमंत्री होतो. साताऱ्याला झुकते माप देण्याचे काम कालही करत आलो आहे, आजही करतोय आणि उद्याही करत राहणार आहे, असे स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगितले.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या मंत्रिपदाबाबत महत्वाचे विधान देखील केले. सातारा जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची संधी आहे का?, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला असताना त्यावर अजितदादांनी हसत ‘हो….’. साताऱ्यातील जनता, कार्यकर्ते आणि पदाधिकारी अतिशय चांगले आहेत, त्यामुळे मला साताऱ्यात काम करायला कायमच आवडतं. मी ज्या ज्या वेळी अर्थमंत्री म्हणून काम केले आहे, त्या त्या वेळी साताऱ्याला निधी देण्याबाबत झुकते माप दिलेले आहे. मंत्रिपदाचा फार्म्युला अजून ठरलेला नाही. आमच्याकडून कोणाला संधी द्यायची, हे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदार आणि नेतेमंडळी मिळवून ठरवू. भाजप आणि शिवसेनेकडून कोण मंत्री होणार, हे त्या पक्षाचे नेतेमंडळी ठरवतील, असे अजित पवार यांनी म्हंटले.
सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. यात वाईतून मकरंद पाटील आणि फलटणमधून सचिन पाटील हे निवडून आले आहेत. यातील मकरंद पाटील यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. मागील महायुतीच्या मंत्रिमंडळात मकरंद पाटील यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, शेवटपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने मकरंद पाटील यांना संधी मिळू शकली नव्हती. तत्पूर्वी महाविकास आघाडीत बाळासाहेब पाटील यांना सहकार मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली होती.