सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार आज वाई विधानसभा मतदार संघात येत आहेत. लाडकी बहीणसह शासनाच्या अन्य लोककल्याणकारी योजनांच्या पार्श्वभूमीवर ते लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी खासदार नितीन पाटील, आमदार मकरंद पाटील यांनी जय्यत तयारी केली आहे. अजितदादांच्या सातारा दौऱ्यात काय घडामोडी घडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
लोकसभेच्या निवडणूकी नंतर अजितदादांनी कामाचा, जनसंपर्काचा धडाका लावलेला आहे. चार दिवसांपूर्वीच ते जिल्हा बॅंकेच्या कार्यक्रमास साताऱ्यात येवून गेले. त्या कार्यक्रमात जेष्ठ नेते रामराजे निंबाळकरांसह सर्वच नेत्यांनी दादांच्या कामाबद्दल भरभरून प्रशंसोद्गार काढले होते. परंतु, परवाच रामराजे पुन्हा तुतारीकडे वळले. शिगेला पोहोचलेल्या घडामोडी आणि पडझडीवर दादा काय भूमिका मांडणार, त्यांची आगामी रणनिती काय असणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यातील वाई , फलटण आणि कराड (उत्तर) या तीन जागा मिळाल्या आहेत. वाईला मकरंद आबांची उमेदवारी निश्चित आहे. फलटणची उमेदवारी परवाच दादांनी दीपक चव्हाण यांना जाहीर केली आहे. तोपर्यंत काल रामराजेंनी भूमिका बदलल्याने त्या जागेचे आता काय होणार. तसेच कराड उत्तरमध्ये दादा कोणता प्रयोग करणार, याची उत्कंठा वाढली आहे. कराड उत्तरेत सर्वच पक्षांच्या इच्छुकांना आपल्याच पक्षालाच उमेदवारी मिळणार असल्याचं वाटतंय. काही उतावळे नवरदेव तर कुठल्याही पक्षाला जागा गेली तरी उमेदवारी मात्र मलाच मिळणार असल्याचे सांगत सुटले आहेत.
वास्तविक कराड उत्तरच्या राजकारणाला अनेक कंगोरे आहेत. ती पार्श्वभूमी जाणून न घेता येथे आजवर उमेदवाऱ्या लादल्या गेल्या त्यामुळे येथे क्लिष्टता वाढत गेली व परिवर्तन अडखळत गेले. कितीही धोपाट्या टाकल्या किंवा कितीही चकाट्या पिटल्या गेल्या तरी शेवटी विद्यमान आमदारांच्याच पथ्यावर पडणाऱ्या गोष्टी ऐनवेळी घडत गेल्या आणि विरोधकांच्या लढाया हवेतच विरल्या. आज कराड उत्तरमधील राजकारण फारच तापू लागले असले तरी भाजपमधील पक्षांतर्गत स्पर्धा व वाढती नाराजीमुळे संभ्रम देखील कायम आहे. कारण विद्यमान आमदारांविरोधात लढण्यास इच्छूक असलेल्या विरोधकांमध्ये एकजीनसीपणा दिसत नाही.
मूळ कराड उत्तरमधील मतदार संख्येचे गणित समजून न घेता व येथील विरोधी प्रवाहातील कार्यकर्त्यांची भूमिका विचारात न घेता इतर पक्षांनी कायम तालुक्या बाहेरील उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या. कोरेगांव , खटाव व सातारा या तालुक्यातील छोट्या छोट्या मतदारसंख्येचे भाग या मतदार संघात येतात. त्यापेक्षा मूळ कराड उत्तरच्या साडेचार जि. प.गटाचे मतदान जास्त आहे शिवाय येथे आजवर नेहमीच यशवंत विचार अबाधित राहीलेला असलेने जर याच भागातील व त्याच वैचारिक पार्श्र्वभूमीचा उमेदवार असेल तरच परिवर्तन शक्य आहे.
हा मतदार संघ अजितदादांनी स्वतःकडे घेतला तर ते यावर वेगळा विचार करून नवी रणनिती आखणार का? याचीच आता सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण व पूर्व भागात पक्ष वाढवायचा असेल तर दादांना कराडवर लक्ष केंद्रित करावेच लागेल याची जाणीव त्यांना आहे व ती उणीव भरून काढायची चक्रे ते फिरवतील हे नक्की!