सातारा प्रतिनिधी | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुती अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उद्या फलटण दौऱ्यावर येत आहेत. उद्या, रविवार, दि. 17 रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या सभेत सद्याच्या राजकीय घडामोडींवर अजितदादा नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी वाई आणि फलटण मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला उमेदवार मिळाले आहे. वाई, महाबळेश्र्वर आणि खंडाळा तालुक्याचा मिळून असलेल्या विधानसभा मतदार संघात आमदार मकरंद पाटील निवडणूक लढवत आहेत. तर फलटण विधानसभा मतदार संघात सचिन सुधाकर पाटील हे उमेदवार आहेत. दोघांच्या प्रचार सभांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या सभेत अजितदादा पवार हजेरी लावणार आहे.
मागील सभेत रामराजेंना दिलाय इशारा…
“तुम्ही दीपक चव्हाण यांच्या (फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार) प्रचाराला जा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता”, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना दिला आहे. आता उद्या पुन्हा अजितदादा फलटण येथे सभेनिमित येत आहेत. यावेळी ते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.