कराड प्रतिनिधी | प्रत्येक वर्षी पुण्यतिथीला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असणारे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रातील राजकीय मंडळी कराड येथील प्रीतिसंगमवर येतात. आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार कराड दौऱ्यावर येत असून ते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनासाठी येणार आहेत. यावेळी काँग्रेसचे नेते अँड.उदयसिंह पाटील यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
कराड येथील प्रीतिसंगमवर अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार कोयना बँकेस भेट देणार आहेत. यावेळी या ठिकाणी महत्वाच्या बैठकीत अनेक चर्चा होणार असून त्यानंतर उदयसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश निश्चित केला जाणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.
यावेळी मंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकारातून महत्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत खा. नितीन पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या निर्णयामुळे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.