कराड प्रतिनिधी | “अलिकडे खूप वेगळ्या प्रकारच्या वाचाळविरांची संख्या वाढलेली आहे. काही पण बोलत असतात, काहीजण कुठे खेकडा म्हणत, कोण वाघ म्हणत, अशा गोष्टी थांबायला पाहिजेत”, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज 111 वी जयंती असल्याने यानिमित्त उपुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री आ.बाळासाहेब पाटील, आ.दिपक चव्हाण, माजी आमदार श्री.आनंदराव पाटील, श्री.संजीवराजे नाईक-निंबाळकर, श्री.नितीनकाका पाटील, श्री.सारंग पाटील, पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर अजितदादांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “दरवर्षी आपण 12 मार्च आणि 25 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी कराडला येत असतो. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेतेमंडळी याठिकाणी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यानुसार मी आज सरकारतर्फे अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. यशवंतराव चव्हाणांनी राजकारणातील सुसंस्कृतपणा कसा टिकवायचा, कसा सांभाळायचा आणि त्याचपद्धतीने कसे काम करायचे हे मुख्यमंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. अनेक महत्त्वाची पदे देखील त्यांनी भूषवली. त्यानुसार आम्हीही आता काम करत आहोत.”
अलिकडे खूप वेगळ्याप्रकारच्या वाचाळविरांची संख्या वाढलेली आहे. काही पण बोलत असतात, काहीजण कुठे खेकडा म्हणत, कोण वाघ म्हणत, अशा गोष्टी थांबायला पहिजेत. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. त्यामुळे या महान व्यक्तींनी महाराष्ट्राला नवीन रस्ता दाखवला आहे, त्याच रस्त्याने आपल्याला जावे लागणार असल्याचे अजितदादांनी सांगितले.
स्वरसुमनांजली कार्यक्रमास अजितदादांनी लावली उपस्थिती
यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ परिसरात पी. डी. पाटील प्रतिष्ठानकडून यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त स्वरसुमनांजली कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास अजितदादा यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. जवळपास अर्धा तास या ठिकाणी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम झाल्यावर उपस्थित हजारो विद्यार्थ्यांसमोर अजितदादांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी माहिती दिली.