सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या अटीतटीची लढत होत आहे. आठ विधानसभा मतदार संघापैकी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये लढत होत आहे. परंतु अजितदादांच्या गटात असलेले विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) हे गटातील उमेदवाराच्या प्रचारात कुठेच दिसत नसल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यव्यापी मतदारसंघनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हंटले.
आज जाहीरनामा अजित पवार यांनी माध्यमांसमोर पत्रकार परिषद घेत आपला पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तसेच त्यानंतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर हे फलटणच्या किंवा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसत नाहीत, असा प्रश्न विचारला असता या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी ते प्रचारात का दिसत नाहीत याबाबतची नोटीस त्यांना पाठवतो असं उत्तर दिलं. त्यामुळे आता अजितदादा त्यांच्या नेत्यावर चांगलेच संतापल्याचे दिसून आले. शिवाय ते खरंच रामराजेंना नोटीस पाठवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
रामराजे यांचे दोन्ही बंधू, संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेतली आहे. राष्ट्रवादीकडून आमदार राहिलेले दीपक चव्हाण यांनी देखील 14 ऑक्टोबरला तुतारी हाती घेतली आणि या पक्ष प्रवेशावेळी रामराजे हे आमच्याच सोबत असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणले होते. दीपक चव्हाण यांनी तुतारी हाती घेण्याआधी अजित पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे 50 मतदारसंघासाठी 50 स्वतंत्र जाहीरनामे
आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत असलेल्या 50 मतदारसंघांसाठी वेगळा जाहीरनामा सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.