सातारा प्रतिनिधी । लाडक्या बहिणींच्या सातव्या हप्त्याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी “लाडकी बहिणी योजनेचा पुढील हप्ता हा 26 जानेवारीच्या आत महिलांना वितरित केला जाणार असल्याचे यांनी म्हटले होते. त्यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ त्याच महिलांना मिळणार ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे. ज्यांचे उत्पन्न त्यापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी उपमुख्यमंत्री अजितदादांनी घोषणा केल्यामुळे राज्यासह सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात ५ लाख १८ हजार ४५१ हुन अधिक लाडक्या बहिणींची संख्या आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू करताना, राज्य शासनाने केवळ गरजवंत महिलांसाठी ही योजना आखली होती. पण काही महिला इनकम टॅक्स भरत असूनही या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे, आता फक्त अडीच लाख रुपये पर्यंत उत्पन्न असणाऱ्या गरजवंत महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना मिळतील.”, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे.
योजनेसाठी 3 हजार 700 कोटींचा चेक
जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजितदादा (Ajit Pawar) म्हणाले कि, आम्ही दिलेले वचन पूर्ण करणार आहोत. यासाठी मोठे पाऊल म्हणून लाडक्या बहिणी योजनेसाठी 3 हजार 700 कोटींचा चेक महिला व बाल कल्याण विभागाला दिला आहे. त्यामुळे हे पैसे लाडक्या बहिणींना दर महिन्याला मिळत राहतील. तसेच या योजनेचे पैसे 26 जानेवारीपर्यंत लाभार्थींच्या खात्यावर जमा होतील. ज्यांचे उत्पन्न महिना 20 ते 21 हजारापेक्षा अधिक आहे, त्या महिलांनी स्वतहून या योजनेच्या लाभाची गरज नाही, असे जाहीर केले पाहिजे. यामुळे सरकारला मोठी मदत मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी
सातारा तालुका : ७६ हजार ४११ लाभार्थी
जावली तालुका : २० हजार ८४३ लाभार्थी
कोरेगाव तालुका : ५० हजार ५८० लाभार्थी
माण तालुका : ३४ हजार ८८५ लाभार्थी,
खटाव तालुका : ४८ हजार ८६८ लाभार्थी
वाई तालुका : ३६ हजार ७२५ लाभार्थी
खंडाळा तालुका : २३ हजार ८३२ लाभार्थी
महाबळेश्वर तालुका : १० हजार ५६९ लाभार्थी
फलटण तालुका : ५८ हजार ३७७ लाभार्थी
पाटण तालुका : ५९ हजार ११४ लाभार्थी
कराड तालुका : ९८ हजार २४७ लाभार्थी
एकूण लाभार्थी : ५ लाख १८ हजार ४५१
एकूण जमा झालेली रक्कम : ७७ कोटी ७६ लाख ७६ हजार ५०० रुपये