पिपाणीमुळे आमचे उदयनराजे वाचले नाहीतर…; फलटणच्या सभेत अजितदादांनी सांगितलं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिग्गज नेतेमंडळी जिल्ह्यात सभा घेत आहेत. यापूर्वी महायुतीकडून भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा जिल्ह्यात झाली. त्यानंतर महायुतीच्या वतीने काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी फलटणमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या खासदारकीच्या निवडणुकीतील विजयाबद्दल एक महत्वाचे विधान केले. “सातारा लोकसभा निवडणुकीवर बोलत असताना पिपाणीमुळे सातारा जागा वाचली, आमचा राजा वाचला, आमचे १३ वे वंशज वाचले, असे अजित पवार यांनी म्हटले.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार सचिन पाटील कांबळे यांच्या प्रचारार्थ काल साखरवाडी (फलटण) येथे सभा आयोजित केली होती. साखरवाडी येथील सभेमध्ये अनेक मान्यवरांची भाषणे झाली. ज्यावेळी अजित पवार यांनी भाषणाला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत कशा प्रकारे अनेक जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले, याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अजित पवार म्हणले की, ‘तुतारी’ पेक्षा ‘पिपाणी’ची किमया मोठी आहे. पिपाणीमुळे आमचे छत्रपती वाचले. त्यामुळेच पिपाणीचा फार मोठा धसका अनेकांनी घेतला आहे. त्यामुळेच अनेकांनी या चिन्हाची दहशत घेतली आहे. काही लोकांनी या चिन्हाविरपुद्ध निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज, लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, तीन मोफत गॅस सिलेंडर, दुधाला ७ रुपये अनुदान इत्यादी सर्व योजनांसाठी एकूण ७५ हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक होता. जेव्हा महायुती सरकारनं योजना जाहीर केल्या, तेव्हा योजनांसाठी लागणारा पैसा कुठून आणणार, असा प्रश्न महाविकास आघाडीनं उपस्थित केला होता. आता महाविकास आघाडीनं अनेक योजना जाहीर केल्या आहेत, त्यासाठी विरोधक पैसे कुठून आणणार? असा सवाल यावेळी अजितदादांनी उपस्थित केला.

लोकसभेवेळी पिपाणीमुळे कसा झाला उदयनराजेंचा विजय

सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक फारच चुरशीची झाली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक लढवली होती. तर भारतीय जनता पार्टीने उदयनराजे भोसलेंना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीमध्ये सदर मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे संजय गाडेही निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांचे निवडणूक चिन्ह ‘ट्रम्पेट’ म्हणजेच स्थानिक भाषेत पिपाणी हे होते. गाडे यांना अपेक्षितपणे तब्बल 37 हजार मतं मिळाली होती. मतदान करताना अनेकांचा पिपाणी आणि तुतारीमध्ये गोंधळ झाल्याने गाडेंना इतकी मतं मिळाल्याची चर्चा साताऱ्यासहीत आजूबाजूच्या परिसरामध्ये रंगली होती. याचाच संदर्भ अजित पवारांनी शनिवारी शाब्दिक कोटी करताना दिला. विशेष म्हणजे उदयनराजे भोसलेंनी ही निवडणूक अवघ्या 32 हजार मतांनी जिंकली होती. पिपाणी आणि तुतारीमध्ये गोंधळ झाला नसता तर वेगळा निकाली लागला असता अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती.