कराड प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे स्पष्ट निकाल समोर आले असून महायुतील दणदणीत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. मात्र, याबाबत अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत कोणताच फॉर्म्युला ठरलेला नसून आम्ही तिघे बसून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे.
आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 40 वा स्मृतिदिन आहे. या दिवसानिमित्त अजित पवार यांनी कराडमधील प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचंही नाव चर्चेत आहे, याबाबत काही निर्णय झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी असे तेव्हा ते आम्ही तिघे बसून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ. मुख्यमंत्रीपदावर सरकारचा कोणताच फॉर्म्युला अजून तरी ठरलेला नाही.
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझी नेता म्हणून निवड झालेली आहे. सर्व अधिकार मला दिले. एकनाथ शिंदे यांची काल नेता म्हणून निवड केली आहे. आता भाजपने नेते निवड कुणाची करायची काय नाही ते ठरवेलं असेल. आम्ही तिघंही नंतर एकत्र बसू. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू. राज्याला मजबूत, स्थिर सरकार देऊ, असं अजित पवार यांनी म्हटले.
युगेंद्र हा धंदापाणी करणारा
सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, युगेंद्र हा धंदापाणी करणारा आहे. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. माझ्या सख्ख्या भावाच्या मुलालाच माझ्या विरोधात उमेदवारी दिली. माझ्या सख्ख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं. मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली, चूक झाली, चूक झाली… पण माझी चूक झाली म्हणजे घरातलाच माणूस उभाकरायचा काय?, असं अजित पवार म्हणाले.
शरद पवारांशी हुकलेल्या भेटीबाबत अजितदादा म्हणाले…
राडमध्ये प्रीतीसंगमावर अजित पवार आणि शरद पवार यांची भेट थोडक्यात हुकली. यावर देखील अजितदादांनी प्रतिक्रिया दिली. ते हणाले की, कदाचित साहेबांची आणि आमची सुद्धा गाठ पडली असती, मात्र पोलिसांनी आम्हाला तिकडे नेलं. आजचा दिवस चव्हाण साहेबांचा स्मरण करण्याचा आहे. सगळ्यांच्या मनात आदराची भावना आहे आणि कायम राहणार आहे. चव्हाण साहेबांचा विचार कधीही महाराष्ट्राची जनता विसरू शकणार नाही. त्यांनी सांगितले की, आम्हाला बहुमत आहे. छत्तीसगड निवडून आलं तिथं ईव्हीएमचा घोटाळा नाही झाला, लोकसभेला आमचा पराभव झाला तेव्हा पराभव मान्य केला. यश अपयश हे मतदारांवर अवलंबून असतं. चव्हाण साहेबांच्या साताऱ्यात एकही महाविकास आघाडीचा माणूस निवडून आला नाही. यशवंतराव चव्हाण असताना जे सरकार बनवलं होतं त्यावेळी पण म्हणायचं होतं का यशवंतराव चव्हाण यांचे विचार सोडले? अशी विचारणा त्यांनी केली. आम्ही या ठिकाणी अभिवादन करायला आलो आहे त्यांचे विचार आम्ही कायम आत्मसात करणार आहोत.