कुणीही कसलाही दबाव टाकला तर मला भेटा, त्याचा योग्य तो बंदोबस्त करू : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची जनसंवाद यात्रा पार पडली. यात्रा संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला जर शासकीय किंवा राजकीय यंत्रणेकडून दबाव टाकून इतर पक्षात येण्याचे आवाहन कोणताही पक्ष करीत असेल तर याबाबत मला थेट येऊन भेटावे!; त्याचा योग्य तो बंदोबस्त आमच्याकडून केला जाईल!; असे आश्वासन पवार यांनी दिले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. अजितदादा पवार म्हणाले कि; ज्यावेळी आपण महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता तेंव्हा भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी बोलून निर्णय घेतला नव्हता. त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून आपण सर्वानी हा निर्णय घेतला होता. जर असा निर्णय झाल्यावर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना मुद्दामून कोणत्याही चौकशीचा धाक दाखवत असतील तर हि बाब आपण खपवून घेणार नाही. याबाबत जर शासकीय यंत्रणा असेल तर त्यांच्याकडून अथवा कोणत्याही राजकीय पक्षाची पदाधिकारी असतील तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना सदरील बाब निदर्शनास आणून यामध्ये तातडीने बदल करण्याच्या सूचना आमच्याकडून दिल्या जातील.

यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले कि; श्रीमंत रामराजे यांच्यासोबत गेले अनेक वर्षे मी कामकाज करीत आहे. श्रीमंत रामराजे यांच्यासोबत काम केले असल्याने त्यांनी नक्की कोणता इशारा दिला कि त्यांच्या मनामध्ये काय सुरु असते ? हे मला चांगले माहित आहे. पक्षाध्यक्ष म्हणून सर्व कार्यकर्त्यांना मी आश्वस्त करू इच्छितो कि; कोणत्याही पक्षाने कसलाही त्रास जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देत असतील तर त्यांच्या पाठीमागे आपले राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे खंबीरपणे उभे राहणार आहेत. कोणत्याही कार्यकर्त्यांनी मनामध्ये कसलीही शंका न आणता पक्षाचे विचार व सर्वसामान्य नागरिकांची कामे हि केली पाहिजेत. त्यामध्ये श्रीमंत रामराजेंच्या माध्यमातून फलटणमध्ये ती मागे राहणे शक्य सुद्धा नाही.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे फलटण तालुका अध्यक्ष बापूराव गावडे, बाजार समितीचे संचालक शंभूराज पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेश्मा भोसले, सरडे येथील कांतीलाल बेलदार यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासमोर उपस्थित केल्या.