विधानसभेसाठी कोरेगाव मतदार संघ महायुतीत राष्ट्रवादीला सोडावा; अजितदादा गटातील नेत्यानं केली महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव विधानसभा मतदार संघात आजही राष्ट्रवादी (अजित दादा पवार) गटाची मोठी ताकद आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेसाठी हा मतदार संघ राष्ट्रवादीसाठी सोडावा, राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर आम्ही जो उमेदवार देऊ तो निवडणूक आणू, असा विश्वास कोरेगाव तालुका राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) उपाध्यक्ष प्रा. बबनराव भिलारे यांनी व्यक्त केला.

कोरेगाव तालुका राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) उपाध्यक्ष प्रा. बबनराव भिलारे यांनी देऊर येथे नुकतीच पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रा. बबनराव भिलारे म्हणाले, कोरेगाव तालुक्यातील जनतेने नेहमीच राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी ठाम राहणे पसंत केले आहे. पक्षाच्या स्थापनेपासून या मतदारसंघावर राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व राहिले आहे यामुळे या मतदारसंघात आज कार्यरत बहुतांश राजकीय कार्यकर्ते हे मूळचे राष्ट्रवादीच्या तालमीत तयार झाले आहेत.

सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, सोसायटी या राष्ट्रवादीच्या घड्याळावर लढल्या गेल्या आणि जिंकल्याही. गेल्या वीस वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोट्यावधीचा निधी तालुक्याला देत विकासाचा नवा मार्ग दाखवला आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर, आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, तालुकध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुका राष्ट्रवादी पक्ष सक्रिय आहेत.

सर्वाधिक वेळा राष्ट्रवादीचा आमदार राहिल्याने जागा वाटपात कोरेगाव मतदारसंघ हा राष्ट्रवादी पक्षाला मिळावा याठिकाणी पूर्ण ताकतीने पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणून पक्षाला व तालुक्याला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ अशी तालुक्यातील कार्यकर्त्यांची आग्रही मागणी असल्याचे भिलारे यांनी म्हंटले.