सातारा प्रतिनिधी | सद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाकडून तालुकाध्यक्ष निवडी केल्या जात आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोरेगाव, वाई, खंडाळा, खटाव, महाबळेश्वर, कराड, फलटण आणि पाटण तालुकाध्यक्षांच्या निवडी नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष अमित कदम, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्या हस्ते नवनियुक्त तालुकाध्यक्षांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवाजीराव महाडिक (कोरेगाव), प्रमोद शिंदे (वाई), दत्तानाना ढमाळ (खंडाळा), नंदकुमार मोरे (खटाव), बाबुराव सपकाळ (महाबळेश्वर), जितेंद्र डुबल (कराड), जयकुमार इंगळे (फलटण), सागर पाटील (पाटण) यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती संजय देसाई, माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, कांतीलाल पवार, राजेंद्र घाडगे, राजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष संजीवराजे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक – निंबाळकर, आमदार मकरंद पाटील आणि आमदार दीपक चव्हाण यांच्या मान्यतेने जिल्ह्यात पक्ष संघटना बळकटीसाठी तसेच पक्ष विचारधारा तळागाळात रुजवण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत.