साताऱ्यात रात्री बैठक घेत अजितदादांच्या कार्यकर्त्यांना सूचना; म्हणाले, तुम्हाला विचारात घेऊनच…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा येथे शुक्रवारी शिवशस्त्र शौर्यगाथा शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आदल्या दिवशी गुरूवारी रात्रीच सातारा येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. तसेच रात्री राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, किसन वीरचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, सातारा-जावली मतदार संघाचे नेते अमित कदम, कोरेगाव तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक, बाबुराव सपकाळ, दत्तानाना ढमाळ, साधू चिकणे, प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, बंडा गोडसे, युवराज सुर्यवंशी, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी पक्षाच्या संघटनेचे अस्तित्व विधानसभांमध्ये दिसले पाहिजे, असे सांगून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन बळकट करण्याच्या सूचना प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्ये जरी राष्ट्रवादीचा आमदार नसला, तरी त्याठिकाणीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल, अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचे संघटन झाले पाहिजे. सध्या ‘लाडकी बहीण’ या योजनेसह अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा. संघटन मजबूत असल्यास हे काम चांगल्या पद्धतीने करता येईल, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जागा वाटपात सातारा विधानसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी आग्रही मागणी पक्षाचे युवा नेते अमित कदम यांनी केली. यावर जागा वाटपाचा फॉर्म्युला सध्या तरी प्राथमिक स्वरूपात आहे. मात्र निवडणुकीपूर्वीचे सर्वेक्षण आल्यानंतर मेरीटप्रमाणे उमेदवारीचा निर्णय घेण्यात येणार आहे. तूर्तास तरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी संघटन वाढवावे, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.