सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मनसे प्रमुख म्हणून राज ठाकरे काम करतात. शिवसेना उबाठाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे काम करत आहेत, त्यांच्या पक्षांच्या संबंधात त्यांनी काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. दोन्ही पक्षांना इतर राजकीय पक्षाने सांगण्याचे कारण नाही. मात्र, जो काय निर्णय घ्यायचा, तो त्यांनी सद्सदविवेकबुद्धीला स्मरून काय तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली.
यावेळी अजित पवार पुढे म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रदीर्घ कालावधीपासून रखडलेल्या आहेत. आमच्यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांचे सदस्य, पदाधिकारी काम करायला असतील तर निश्चितपणे काम करणे सोपे जाते. केवळ प्रशासनावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात-लवकर घेण्यात याव्यात, यासाठी आम्ही आग्रही आहोत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.
स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी, सदस्य सोबत असणे आवश्यक असते. त्यासाठी या निवडणुका व्हायला हव्यात. ही स्थानिक मंडळीच कामे सुचवत असतात त्यानुसार कामे मार्गी लावणे सोपे होते. जनतेचे प्रश्न आणि विकासकामे सुटायला मदत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन गावी आल्याचे विचारले असता ना. पवार म्हणाले, ना. शिंदे यांना गावी गेल्यानंतर बरे वाटते. तिथे नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या अनुषंगाने त्यांना प्रशासनाशी बोलता येते. हा प्रकल्प त्यांचे स्वप्न आहे. त्यामुळेच ते गावी जातात. गावी गेल्यानंतर ते पक्षवाढीचेही काम करत असतात. ते गावी जाण्याआधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी, केंद्रीय उड्डाणमंत्री नायडू, राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ आम्ही सर्वजण अमरावतीत एकत्र होतो. तिथून परत मुंबईला येत असताना ना. शिंदे यांनी मी तीन दिवस गावी जाऊन येणार आहे, असे सांगितले. त्यामुळे ते नाराज आहेत, ही चर्चा फोल आहे.
यावेळी पवार म्हणाले, सातारची जिल्हा बँक देशामध्ये अग्रगण्य बँक आहे. खा. नितीन पाटील आणि त्यांच्या संचालक, अधिकारी यांनी बँकेत चांगले काम केले आहे. जिल्हा बँकेचे जे प्रश्न आहेत, त्यावर सहकार विभागाच्या अधिकार्यांशी बोलून मार्ग काढणार आहे. जिल्हा बँकेतील रखडलेल्या भरतीचा प्रश्न निकाली काढला जाईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी आश्वासित केले.
यावेळी पवार म्हणाले, मी कामाचा माणूस आहे. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत काम करण्यासाठी वेळ देतो. लोकांनी, लाडक्या बहिणींनी मला पाठबळ दिले आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यावर मी भर देणार आहे. नाशिकला कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करुन एक क्लिप व्हायरल केली गेली. मात्र, हिंदूह्रदयसम्राट आपल्यातून निघून गेले आहेत, त्यामुळे जनतेला काय खरं अन् काय खोटं ते माहित आहे.
काळानुरुप वडिलधारी माणसं बाजूला होतात. ते बाजूला झाले नाहीत तर मतदार त्यांना बाजूला करतात…
यावेळी पवार म्हणाले, पृथ्वीराजबाबांनीही पूर्वी महत्वाच्या पदांवर काम केले आहे. चक्र फिरत असते, तसं काळानुरुप वडिलधारी माणसं बाजूला होतात. ते बाजूला झाले नाहीत तर मतदार त्यांना बाजूला करतात. स्व. विलासकाकांसोबत आम्ही काम केले आहे. उदयसिंह पाटील यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे. त्यांची तिसरी पिढी लोकसेवेत कार्यरत आहे. आमच्या पध्दतीनेच ते विचार करतात, त्यामुळे ते आमच्यासोबत आले आहेत.
तर राष्ट्रवादी वाढेल…
माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्ही काळजी करू नका. जनतेचा पाठिंबा असेल तर आमची राष्ट्रवादी वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात व्यक्त केला.
रामराजेंनी कालच मला फोन केला…
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आमच्या पक्षाचे आमदार असून, त्यांना कुठे अडचण असेल तर आम्ही मदत करू. रामराजेंनी मला कालच फोन करून सांगितले होते. त्यांच्या पत्नीची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत.” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.