कराड प्रतिनिधी | टेंभू योजनेच्या पाण्यामुळे बुडीत क्षेत्रात गेलेल्या नदीकाठच्या शेतीची जिरायत नोंद घेऊन संपादनाचा कमी मोबदला निश्चित केल्याची बाब सुपने परिसरातील शेतकऱ्यांनी वाई दौऱ्यावेळी अजितदादांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे अजितदादा चांगलेच संतापले. कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना दादांनी फोनवरून झापलं.
सुपने परिसरातील शेतकरी मोबदल्यापासून वंचित
टेंभू उपसा योजनेच्या पाण्यामुळे नदीकाठावरील दोन्ही बाजूची शेती बाधित झाली आहे. टेंभूपासून ते तांबवे पर्यंत नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करून मोबदला देण्यात आला. मात्र, यातून सुपने, पश्चिम सुपने आणि तांबवे गावातील काही शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यांनी अनेक दिवसांपासून टेंभू उपसा योजनेच्या कार्यालयात हेलपाटे मारले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली.
शासनाच्या जीआरनुसार जिरायत म्हणून नोंद
वास्तविक टेंभूपासून ते तांबव्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांना बाधित जमिनीचा मोबदला यापूर्वी देण्यात आलाय. तो बागायत क्षेत्राच्या बाजारभावानुसार दिला गेला आहे. मात्र, सुपने आणि पश्चिम सुपने या दोन गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंद जिरायत म्हणून घेण्यात आलीय. बागायत क्षेत्रासाठी शासनाने प्रति गुंठा ९३००० रूपये मोबदला निश्चित झाला होता. मात्र, प्रशासनाने जिरायत क्षेत्राचा ५३००० रूपये मोबदला निश्चित केला. तो शेतकऱ्यांना मान्य नाही.
अजितदादांनी थेट मंत्रालयात केला फोन
अजितदादा सोमवारी (७ ऑक्टोंबर) वाई दौऱ्यावर असताना सुपने गावचे शेतकरी धनाजी पाटील यांनी दादांना निवेदन देवून महसूल खात्याची चूक निदर्शनास आणून दिली. नदीकाठची शेती जिरायत दाखवल्याने अजितदादांनीही आश्चर्य व्यक्त केले. थेट मंत्रालयात फोन करून पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यानंतर कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनाही फैलावर घेतलं. प्रांताधिकाऱ्यांनी तसा जीआर असल्याचं सांगताच अजितदादा म्हणाले, असे रोज जीआर निघतात आणि रद्दही होतात. शेतकऱ्यांचे नुकसान करू नका. बागायत शेतीनुसारच शेतकऱ्यांना भरपाई द्या, असा आदेशच अजितदादांनी दिला.
जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पुढील आठवड्यात मिटींग
अजितदादांच्या सूचनेनुसार खासदार नितीन काका पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत मिटींग आयोजित केली आहे. या मिटींगला कराडच्या प्रांताधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आलं आहे. खासदार नितीन पाटील यांनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दल सुपने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.