कराड प्रतिनिधी | संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज मंगळवारी (दि .१२ मार्च) रोजी १११ वी जयंती आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी प्रीतिसंगमावर येणार आहेत. रात्री उशिरा त्यांचा दौरा निश्चित झाल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
प्रशासनाची उडाली तारांबळ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कराड दौरा सोमवारी रात्री उशिरा निश्चित झाला. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता अजितदादा कराडच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. उपमुख्यमंत्री कराड दौऱ्यावर येत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी नेते यशवंतरावांना मानतात आदर्श
संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री हे प्रीतिसंगमावर येऊन यशवंतरावांच्या समाधीला अभिवादन करतात. यशवंतराव चव्हाण यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदर्श मानतात.
पुण्यतिथीला मुख्यमंत्र्यांनी मारली होती दांडी
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उपस्थित राहत असतात. अलीकडच्या काही वर्षात ही परंपरा अधून मधून खंडित होताना पाहायला मिळाली आहे. नोव्हेंबर 2023 ला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रीतिसंगमावर उपस्थित राहू शकले नव्हते.