सातारा प्रतिनिधी । राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील उ,जागा वाटप आणि उमेदवारी निश्चितीच्या राजकीय हालचाली चांगल्याच वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली असून, महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होण्या अगोदरच अजितदादांनी आपला पहिला उमेदवारही जाहीर केला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांना अजित पवारांनी फोन करून फलटण, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे दिपक चव्हाण असतील असे सांगत घोषणा केली आहे.
कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रम सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना एक फोन केला. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकरांनी मोबाईल माईकजवळ धरला आणि त्यानंतर पलीकडून अजितदादांनी कार्यकर्त्यांसमोर दिपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली.
अजित पवार कॉलवर काय म्हणाले?
रामराजे नाईक निंबाळकर यांना कॉल करून अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्ह देऊन आपण उमेदवार देणार आहोत. दिपक पवार हे आपले उमेदवार आहेत. त्यांना आशीर्वाद द्यावेत. दिपक चव्हाणांना सहकार्य करावे.”
दिपक चव्हाण सलग तीन वेळा आमदार…
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दिपक चव्हाण हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ३० हजारांचे मताधिक्य घेत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. दिपक चव्हाण यांना १,१७,६१७ मते मिळाली होती. भाजपाचे दिगंबर आगवणे यांना ८६,६३६ मते मिळाली होती. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या अरविंद आढाव यांना ५,४६० मते मिळाली होती. आता दिपक चव्हाण यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे, त्यामुळे ते चौकार मारणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.