कराड प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा साताऱ्याचे पालकमंत्री झाले त्यानंतर उदयनराजे-अजित पवार यांच्यातील द्वंद साताऱ्यासह सबंध राज्याने पाहिले. अलिकडच्या काही वर्षात अधूनमधून एकमेकांवर टीका-टीप्पणी आणि टोमणेबाजीही पाहायला मिळत होती. मात्र, गुरूवारी पुण्यात दोघांमधील ही जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी दोघांच्यात सातारा जिल्हयातील अनेक राजकीय विषयावर चर्चा देखील झाली.
पुणे विभागाची राज्यस्तरीय नियोजन बैठक गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार श्री मकरंद पाटील, आमदार श्री दीपक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री अतुल चव्हाण, जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ज्ञानेश्वर खिल्लारी, जिल्हा नियोजन अधिकारी श्री शशिकांत माळी, विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या आर्थिक तरतुदी बाबत चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने प्रतापगड किल्ला संवर्धन, क वर्ग पर्यटन स्थळे, ग्रामीण तसेच शहरी भागात विकसित करण्यात येणारे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच स्मार्ट प्राथमिक शाळा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद, बांबू लागवडीसाठी आर्थिक तरतूद, शासकीय कार्यालयाची डागडुजी, अंगणवाडी बांधकाम, महिला बाल विकास भवन बांधकाम, वॉटर स्पोर्ट्स विकसित करण्यासाठी या संबंधी चर्चा झाली. पर्यटन आराखडा तयार करून जास्तीत जास्त निधी सातारा जिल्ह्याला मिळावा, अशी विनंती खा. उदयनराजे यांच्यासह आमदारांनी केली. त्यावर जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करू असे उपमुख्यमंत्री अजिदादा पवार यांनी सांगितले.