शिवजयंती महोत्सवात मशालींनी उजळला अजिंक्यतारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या रविवारी रात्री किल्ले अजिंक्यतारावर मशाल महोत्सव आणि लेजर शोचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे किल्ले अजिंक्यतारा हजारो मशालींनी उजळून निघाला तर सातारा शहर लेजर शोच्या प्रकाशात न्हाऊन निघाले.

भाजप आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव समिती यांच्यावतीने रविवारी किल्ले अजिंक्यतावर मशाल महोत्सव, सुनील लाड (कवलापूर, सांगली) यांचे व्याख्यान आणि विविध संस्था व व्यक्तींचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, अनेक मान्यवर, असंख्य कार्यकर्ते आणि हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.

रात्री सातच्या सुमारास युवक व युवतींचे जथ्थेच्या जथ्थे हातात मशाली घेऊन गडावर आले. गडावर सर्वत्र हे मावळे हातात मशाल घेऊन उभे राहिले. यानंतर एक- एक मशाल पेटु लागली आणि हजारो मशाली गडाच्या सर्व तटबंदीवर पेटल्या. यामुळे अजिंक्यतारा उजळून निघाला. किल्ल्यावरून सातारा शहरावर लेजर शो टाकण्यात आला. यामुळे सातारा शहर वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. यावेळी कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला.