सातारा प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून साताऱ्याच्या एतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर काही विघ्नसंतोषी लोकांकडून सुशोभीकरण केलेल्या कामाची नासधूस करण्याचे काम ठरण्यात आले आहे. सुशोभीकरणासाठी वापरण्यात आलेल्या घडीव दगडांची पडझड करणे, पथदिव्यांची झाकणे चोरी करणे, असे प्रकार सातत्याने केले जात आहे. काही दिवसापूर्वी किल्ल्यावरील पाचोळ्यांना वणवा देखील लावण्यात आला होता.
मध्यंतरी अजिंक्यतारा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. सातारा पालिकेकडून या रस्त्याचे रुंदीकरणासह काँक्रिटीकरण करण्यात आले. तसेच रस्त्याकडेला आकर्षक पथदिवे लावण्यात आले असून, नागरिकांना बसण्यासाठी आकर्षक कट्टे देखील बांधण्यात आले आहेत. मंगळाईदेवी मंदिराजवळ तयार करण्यात आलेल्या विरंगुळा कट्ट्याला घडीव काळ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. किल्ल्यावर भटकंतीसाठी येणारे अनेक नागरिक या कट्ट्यावर काही काळ विसावा घेतात व मार्गस्थ होतात. या कट्ट्याला लावण्यात आलेले दगडांची आता काही विघ्नसंतोषींकडून मोडतोड केली जात आहेत. शिवाय पथदिव्यांवरील काचेच्या आवरणावर दगडही मारले जात आहेत.
पालिकेकडून प्रथमच किल्ल्याचे उत्तम पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे. हे काम किल्ल्याच्या व शहराच्या वैभवात भर घालू लागले आहे. मात्र, दुसरीकडे विघ्नसंतोषींकडून उपद्रव सुरू झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. गस्त घालण्याची मागणी पालिकेकडून अजिंक्यताऱ्यावर ५२ पथदिवे लावण्यात आले आहेत. यापूर्वी २२ पथदिव्यांच्या स्वीच वरील बिडाची झाकणे चोरीला गेली आहेत. असे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. पालिका प्रशासनाने असे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, चार भिंती व अजिंक्यतारा परिसरात पोलिसांच्या सहकार्याने गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.