राज्याचे 3 वर्षांचे कृषी पुरस्कार जाहीर; जिल्ह्यातील 11 शेतजकऱ्याचा सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. शुक्रवारी राज़्य शासनाने २०२० ते २०२२ या तीन वर्षातील पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. यामध्ये माण, खंडाळा, वाई आणि फलटण तालुक्यातील प्रत्येकी दोघां शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार मिळाला आहे.

कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना डाॅ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण आणि आदिवासी गट), पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार (आयुक्त व मंत्रालय स्तर) असे अनेक पुरस्कार राज्य शासनाकडून प्रगतिशील शेतकऱ्यांना दिले जातात.
सातारा जिल्ह्यातील एकूण १२ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जिल्ह्यात ‘या’ शेतकऱ्यांना मिळाले ‘हे’ पुरस्कार

२०२० चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) पुरस्कार वरखडवाडी, ता. वाई येथील नितीन बाजीराव वरखडे यांना जाहीर झाला आहे. तर २०२१ चा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रुकच्या सचिन साधू सांगळे यांना मिळाला आहे. २०२१ चा कृषीभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार अरुण चंद्रकांत कचरे (वाघेरी, ता. कराड) यांना जाहीर करण्यात आला आहे. २०२१ चा युवा शेतकरी पुरस्कार धामणेर, ता. कोरेगाव येथील साैरभ विनयकुमार कोकीळ यांना जाहीर करण्यात आला आहे. २०२१ चा उद्यानपंडित पुरस्कार रामदास भुजंगराव कदम (रा. गिरवी, ता. फलटण) यांना देण्यात येणार आहे. २०२१ या वर्षातील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) पुरस्कार अधिक मारुती माने (रा. मानेगाव, ता. पाटण) यांना मिळाला आहे.

२०२२ चा कृषीभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार माण तालुक्यातील देवापूरच उध्दवराव ज्ञानेश्वर बाबर यांना प्रदान करण्यात येणार आहे. २०२२ चाच वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार संदीप राजाराम डाकवे (रा. डाकेवाडी, ता. पाटण) यांना जाहीर झाला आहे. २०२२ चा युवा शेतकरी पुरस्कार आसवली, ता. खंडाळा येथील नीलेश हणमंत पवार यांना मिळाला आहे. तर टाकेवाडी, ता. माण येथील जालिंदर जगन्नाथ दडस यांना २०२२ चा उद्यानपंडित पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२२ चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) खडकी, ता. वाई येथील प्रशांत भिकू शिंगटे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील सासकल येथील कृषी सहाय्यक सचिन जाधव यांना २०२२ चा पद्यश्री डाॅ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे.

चौदा वर्षे सेंद्रिय शेतीचा प्रयोग : अरुण कचरे

गेली चौदा वर्षे झाली मी सेंद्रिय शेती करत आहे. या चौदा वर्षात काहीही केमिकल अथवा कोणतेही खत दिलेले नाही. आम्ही सेंद्रिय गूळ तयार करून तो माल आपल्या नावावरच विकत आहे. सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून त्याशिवाय पुढील काळात पर्याय नाही. मला पुरस्कार घोषित करून राज्य शासनाच्या कृषी विभागाने माझा सन्मान केल्याबद्दल मी शासनाचे धन्यवाद मानत असल्याची प्रतिक्रिया चित्रपट निर्माते, सेंद्रिय शेती करणारे शेतकरी अरुण कचरे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.