कराड प्रतिनिधी । यंदा कृष्णा व आरफळ कालव्याला पाणी नसल्याने ऐन उन्हाळ्यात पिकांची होरपळ सुरू आहे. शेतीच्या पाण्याची स्थिती बिकट होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांकडून ऊस शेतीकडे पाठ फिरवली जात आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील ५९ पाझर तलावांपैकी ४४ पाझर तलाव आटले आहेत.
शेतकऱ्यांनी चारा, भाजीपाला, उन्हाळी भुईमूग या पिकांचा पर्याय निवडला आहे. शेतीला पुरेसे पाणी मिळणार नसल्याने हंगामात ऊस क्षेत्र चाळीस टक्केपर्यंत घटेल असा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तविला आहे. पाणी टंचाईची दाहकता लक्षात घेता शासन पातळीवरूनही जादा पाण्याची पिके शेतकऱ्यांनी घेऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनाही मार्च अखेरीस कॅनॉल, विहिरी, ओढे कोरडे पडल्याने ऊस पिकाला अपेक्षित पाणी मिळणार नाही, याचा अंदाज आला आहे.
परिणामी पाण्याची पातळी खालावली आहे.
कृष्णा कॅनॉल आणि आरफळ कॅनॉलवर अवलंबून हजारो एकर शेती क्षेत्र आहे. कृषी विभागाकडील माहितीनुसार, गेल्या वर्षी कराड तालुक्यात ३१ हजार ५४० हेक्टर ऊसाचे क्षेत्र होते. यावर्षी ते २९ हजार ६८८ हेक्टर नोंदविले गेले आहे. सद्यस्थितीत सकृष्णा व आरफळ कॅनॉलला फेब्रुवारीपासून पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे कॅनॉलवर अवलंबून असणारी शेती धोक्यात आली आहे.
कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस पिकाला बगल देत अन्य पिकांचा पर्याय शोधला असल्याची माहिती कराड तालुका कृषी अधिकारी डी. ए. खरात यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.