सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळ भाग म्हणून ओळख असलेल्या खटाव तालुक्यात पाणी प्रशन चांगलाच पेटला आहे. खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर प्रशासनाच्या दारात जागरण, गोंधळ घालण्यात आला. यावेळी वाघ्या मुरळीद्वारे ‘पाण्यासाठी नाचते मी पर्वा कुणाची..’ चे सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
खटाव तालुक्यात सध्या पिण्यासह शेतीच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून याकडे प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. खटाव तालुक्याची शेती पाणी समस्या सोडविण्यासाठी येरळा नदी प्रवाहित करून येरळवाडी धरण भरावे या मागणीसाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समिती व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांच्यावतीने येथील तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशदारात सोमवारीपासून बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. मंगळवारी येथील तानाजीराव दळवी यांच्या जयमल्हार जागरण पार्टीचा आंदोलनस्थळी जागरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे तहसिलदार कार्यालयात कामासाठी आलेल्या लोकांची आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली होती. तालुक्याच्या शेती पाणी समस्येबद्दल या निमित्ताने नागरिकांत मोठी चर्चा होत होती.
उपोषणात निमंत्रक विजय शिंदे, अनिल पवार, नाना पुजारी, सुर्यभान जाधव, दत्तूकाका घार्गे आदिनी सहभाग घेतला. दरम्यान, कृष्णा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती पी. आर. यादव, उरमोडी उपसा सिंचना विभागाचे शाखा अभियंता डी.जे. जाधव तसेच अन्य अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. आंधळी धरणात कोणत्या निकषातून पाणी सोडले त्याची आम्हाला माहिती द्यावी तसेच तेच निकष वापरून येरळवाडी तलावातही पाणी सोडण्याची आग्रही मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या प्रश्नावर अधिकारी निरूत्तर झाल्याने ही चर्चा निष्फळ ठरली.